ख्रिसमस ट्री आणि पर्यावरण
Christmas Day 2023 : नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगात सर्वत्र नाताळची लगबग पाहायला मिळत आहे. हा सण संपूर्ण जगात आनंदात साजरा केला जातो. नाताळच्या काळात मित्रमंडळी, नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. दिव्यांच्या रोषणाईने आसमंत उजळून निघतो. या दिवसात दोन गोष्टी सर्वात लक्षवेधक असतात एक म्हणजे रात्री येणारा आणि बच्चे कंपनीला गिफ्ट देणारा सांताक्लॉज आणि दुसरे म्हणजे ख्रिसमस ट्री.
नाताळच्या निमित्ताने ख्रिसमस ट्रीला रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात येते. घरी किंवा अगदी ऑफीसेसमध्येही नाताळच्या काळात हे ट्री प्रामुख्याने दिसत असतात. त्यामुळे नाताळच्या दिवसात ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी असते. कृत्रिम ख्रिसमस ट्री हल्ली सर्वत्र उपलब्ध असतात. ते स्वस्त आणि एका ठिकाणहून दुसरीकडे न्यायलाही सोपे असतात. असे असले तरीही अनेक देशांत बऱ्याच ठिकाणी खऱ्या ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी असते.
जगभरात प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप अशा अनेक ठिकाणी खास ख्रिसमस ट्रीची शेती केली जाते. स्कॉटलंडमधील एडनमी फार्म हे त्यातल एक आहे. याठिकाणी स्कॉट पाईन, फर, नॉर्डमन फर, स्प्रूस अशा अनेक प्रकारच्या झाडांची शेती केली जाते. नाताळच्या काळापर्यंत ही झाडे वाढवतात आणि त्यांची अतिशय नेमक्या पद्धतीने कापणी केली जाते. ही झाडे वर्षाला ३० सेंटीमीटर इतकी वाढतात. ही झाडे घरात ठेवण्यासाठी लागत असल्याने ठराविक उंचीची झाली की मग त्यांची विक्रीसाठी कापणी करण्यात येते. झाडांचा आकार जितका मोठा तितकी त्याची किंमत जास्त. ही शेती करणाऱ्यांचे नाताळच्या काळात चांगले उत्पादन होते.
दरवर्षी १ डिसेंबरला ख्रिसमस ट्रीची कापणी करायला सुरूवात होते. त्यानंतर वेगवेगळ्या देशांत मागणीनुसार त्याची निर्यात केली जाते. युरोपात दरवर्षी ८० लाखांहून अधिक तर अमेरिकेत अडीच ते तीन कोटी ख्रिसमस ट्रीची विक्री वर्षभरात होते. दरवर्षी ही मागणी कमी अधिक प्रमाणात बदलते. अमेरिकेत काही ठिकाणी विक्रीसाठी म्हणून ख्रिसमस ट्री जाणीवपूर्वक वाढवली जातात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. परंतु बहुतेकदा ख्रिसमस ट्री म्हणून पाइन, फर, स्प्रूस यांची लहान झाडे वापरली जातात. त्यामुळे या व्यवसायाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता वाढत आहे. असे असले तरीही ख्रिसमस ट्रीमुळे पर्यावरणाला फायदा होतो याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.
एरव्ही इतर उद्देशांसाठी किंवा शेतीसाठी जमीनवापराचा दबाव वाढत असताना, ख्रिसमस ट्रीच्या वनांमुळे अन्य जिवांना अधिवास लाभतो. जैवविविधतेचा ऱ्हास आणि हवामानबदल या दोन संकटांच्या पार्श्वभूमीवर, जमिनीचा हा वापर अमेरिकेत महत्त्वपूर्ण आहे. कापण्यापूर्वी ही झाडे जवळ जवळ दहा वर्षे वाढवली जातात. त्यामुळे कापल्या गेलेल्या प्रत्येक झाडामागे नऊ झाडे अद्यापही टिकाव धरून असतात. कोणतेही झाड वातावरणातील कार्बन शोषून घेते, त्याचा साठा करते आणि कार्बन प्रदूषणाला काही अंशी मदत करते. त्यामुळे योग्य व्यवस्थापन केलेली वने हवामान संकटावर मात करण्यात काही अंशी तरी मदत करत असतील ते ठळक होते.