कलाविश्वावर शोककळा! ‘सीआयडी’फेम फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस याचं निधन
मुंबई | Dinesh Phadnis Passed Away : कलाविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. ‘सीआयडी’ (CID) फेम फ्रेड्रिक्स (Fredericks) उर्फ दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून दिनेश फडणीस यांची तब्येत चिंताजनक नव्हती. तर सोमवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिनेश फडणीस यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. मात्र, सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिनेश यांच्यावर मंगळवारी (5 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीआयडी’ शोची संपूर्ण टीम दिनेश यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. तसंच दिनेश यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.
दिनेश फडणीस यांनी ‘सीआयडी’ मालिकेमध्ये फ्रेड्रिक्स ही भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आजही ते फ्रेड्रिक्स या नावानेच ओळखले जातात. तसंच त्यांनी अनेक मालिका, शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.