विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

मुंबई | Vinayak Mete Accident – शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. तसंच या अपघाताबाबत अनेकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर आता विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.  

दरम्यान, विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज (17 ऑगस्ट) त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Sumitra nalawade: