गुजराती कंपनीकडून पिंपरी चिंचवड पालिकेच्या तिजोरीवर डल्ला?
पिंंपरी येथील लिंकरोड उड्डाणपुलाखाली सिव्हिल वर्कचे ९ कोटी ५० लाख रुपयांचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदार व आर्किटेक्टने यांनी सादरीकरण केलेले काम आणि प्रत्यक्ष केलेले काम यात पूर्णपणे तफावत असल्याची माहिती आहे. संबंधित ठेकेदाराला हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण करायचे होते. पण दोनदा मुदतवाढ देऊन काम न करता ठेकेदाराने कोट्यवधींची बिले अदा केली असल्याची बाब उघड झाली आहे. हे काम गुजराती कंपनीच्याकडून सुरू आहे. हे काम करणारे ठेकेदार,आर्किटेक्ट आणि अधिकाऱ्यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला असल्याचा आरोप नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे.
महापालिका भवनात पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रकाश जाधव, काशिनाथ नखाते, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे आदी उपस्थित होते. यावेळी चिंचवड लिंक रस्त्यासमोरील यशोपूरम सोसायटी, संत गार्डन साई ग्रेस सोसायटीसमोर पुलाखाली सिव्हिल वर्कचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष मात्र तपशिलानुसार काम करण्यात आलेले नाही, असे मारूती कांबळे यांनी सांगितले. या प्रकरणी बोगस सल्लागार, आर्किटेक्ट, ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला घातल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व निविदांची सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी अधिकारी, ठेकेदार, आर्किटेक्ट यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
हेही वाचा- पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाला ग्रहण; चार मार्गांवरील बससेवा बंद
धक्कादायक माहिती समोर
सर्व दर विश्लेषणाच्या बाबी आर्किटेक्ट हार्दिक के. पांचाळ यांनी केलेल्या पूर्णपणे खोट्या आहेत. पांचाळ यांनी केलेल्या दराचे विश्लेषण महापालिकेतील अधिकारी व पांचाळ यांनी संगनमताने केले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने व आर्किटेक्टनी प्रेझेंटेशनची रेखाचित्रे आणि प्रत्यक्ष केलेले काम पूर्णपणे भिन्न आहे. संबंधित कामाची मोजमाप पुस्तिका व प्रत्यक्ष झालेले काम हे वेगळे झालेले आहे. संबंधित कामाची बिले अकाऊंटनी कशी अदा केली त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाशी संगनमत करून संबंधित आर्किटेक्ट, ठेकेदार यांनी मूळ डिझाईन बदलून काम सुरू ठेवले आहे. ते करताना अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील सर्व बाबी प्रत्यक्षात कार्यान्वित करता येत नसल्याने खोटी निविदा काढल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. मागील ६ वर्षांपासून हे काम सुरू आहे, या कामात स्थापत्य प्रकल्पासह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि इतरही अधिकाऱ्यांनी बिले अदा केलेली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात अपहार झालेली रक्कम संबंधितांकडून चार पटीने वसूल करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील लोकप्रतिनिधी प्रशासनाशी मिलीभगत करून ठेके घेत आहेत. ठेकेदाराची घरे भरण्याचा हा प्रकार सुरू असल्याचे निर्दशनास आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केला.
हेही वाचा- पुणे महानगरपालिका मालामाल; मिळकतकरामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे उत्पन्न
आयुक्तांवर राजकीय दबाव?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामांत झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार पुराव्यासह करण्यात आली आहे. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी त्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्यंत केलेली नाही. राजकीय दबावामुळे आयुक्त कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. प्रशासकीय राजवटीत अधिकारी मुजोर झाले असून, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत असा आरोप मा. नगरसेवक कार्यकर्ते भापकर यांनी केला आहे.
2 Comments