डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. या निकालात जनतेने महायुतीला भरघोस यश दिले. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांच्या १३२ जागा आल्या. तर महायुतीच्या मिळून एकूण २३३ जागा आल्या. यादरम्यान डोंबिवलीमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायल होत असलेला व्हिडीओ हा डोंबिवलीतील आहे. डोंबिवलीतील कुंभारखान पाडा परिसरातील विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मेघराज तुपांगे यांच्यात हा वाद झाला होता. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला होता हे मात्र समजू शकलेले नाही.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा २ मिनिटांचा आहे. यामध्ये गाड्यांमधून आलेले कार्यकर्ते हे रस्त्यावर उभे असलेल्या कार्यकर्त्यांना भिडताना दिसत आहेत. यावेळी दोन्ही पक्ष आमने – सामने आल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. या गोंधळाची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.