सासवडच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मारली देशात बाजी! महाराष्ट्राला मानाचे पान
सासवड : (Clean Serve City 2023) केंद्र सरकारने आज (गुरुवारी) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बाजी मारल्याने हे महाराष्ट्रासाठी देखील मानाचे पान मानले जात आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवडने देशात पहिला क्रमांक मिळवल्याने राज्यासाठी हि अभिमानस्पद बाब आहे. शिवाय एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राची नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम आहे, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातीलच लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. भोपाळ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.
गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला.