“हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पलटवार

मुंबई : (CM Eknath Shinde Replied On Uddhav Thackerey’s Comment Over Bhagatsingh Koshyari) “राज्यातील मोठमोठे प्रकल्प हिसकावून घेतले जात आहेत, आता राज्यातील गावही घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, आमच्या आदर्शांचा अपमान केला जातोय” असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत (Uddhav Thackerey Press Conference) महाराष्ट्र प्रेमींनी याचा विरोध करायची वेळ आलीये. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आणि महराष्ट्र बंदची हाक द्यावी लागली तरी चालेल असं आवाहन जनतेला केलं आहे. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना आम्ही जी पूर्वी भूमिका घेतली होती तशी भूमिका घ्यायला हवी अशी आशा देखील व्यक्त केली.
“हिंदुत्वाच्या संबंधित महाविकास आघाडीतील पक्षांकडून काही गैर वक्तव्य केलं गेलं तर महाविकास आघाडीला तडे पडतील अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. तशी भूमिका मिंदे गटाने घ्यायला हवी. मात्र, ते घेऊ शकत नाहीत. त्यांना त्यांची खुर्ची महत्वाची आहे.” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
“महाविकास आघाडी स्थापन करून त्यांच्यासोबत जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या आणि हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे तुम्हाला महाराजांबद्दल आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.” असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.