काॅमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचं निधन

मुंबई | Comedian Raju Srivastava Death – काॅमेडी किंग राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं आज (21 सप्टेंबर) सकाळी निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. तसंच प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातील आणि विदेशातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
राजू श्रीवास्तव 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकानं तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. पण यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास त्यांच्या मेंदूनही काम करणं बंद केलं. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. गेल्या महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची आज प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 2005 मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं होतं. तसंच ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हटलं जातं. त्यांनी मैने प्यार किया, बाजीगर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत.