महाराष्ट्ररणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्ट

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अजित पवारांचा सरकारवर निशाणा

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांत कलगीतुरा रंगला असतानाच राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मागील ४५ दिवसांत राज्यात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले पाहिजे. आताच्या सरकारमधील सत्तार यांनी पवारसाहेबांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. त्याचबरोबर पवारसाहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण केले, हे आपण पाहिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेने सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करताना आत्महत्या होणे ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही, हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या. सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल, असेही पवार यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावे. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने पिकांसाठी हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, तसेच फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली. तसेच, यंदा महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून १ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पुढे जाईल.

या सरकारला पीक कर्जाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. पीक कर्ज माफ केले पाहिजे. कोसळलेल्या घरांच्या नुकसानभरपाईसह ओलाव्यामुळे भेगा पडलेल्या घरांचाही पंचनामा झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळा, शासकीय इमारतींचेदेखील पंचनामे झाले पाहिजेत, अशी मागणीदेखील अजित पवार यांनी केली आहे.

त्याचबरोबर, मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड, लातूर या ठिकाणी गोगलगायीमुळे कोवळ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. उगवलेले सोयाबीन गोगलगायीने खाल्ल्यानंतर नुकसानभरपाईची तरतूद नियमात नाही, त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
घ्यावा लागेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये