शिवसेनेसाराखीच होणार छत्तीसगढ कॉंग्रेसची स्थिती?; अंतर्गत नाराजीमुळे मंत्र्याचा राजीनामा!

रायपुर : महाराष्ट्रातील शिवसेनेतील आमदारांची बंडाळी यशस्वी झाल्यानंतर इतर राज्यांतील सरकार सावध झालेले आहेत. नुकतीच गोव्यातून पाच आमदार चेन्नईला निघून गेल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे छत्तीसगढमध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तेथील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळीची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात महाव्कास आघाडी सरकार कार्यरत असताना शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद होते मात्र शिवसेनेचे अनेक आमदार आघाडीतील इतर पक्षांकडून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे आणि पक्षप्रमुख आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाराज होते. आणि शेवटी त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि भाजपसोबत गेल्याने पुन्हा एकदा सत्तेत येता आले. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांच्या यशस्वी खेळीमुळे अनेक राज्यांतील नाराज नेत्यांना चांगलाच पर्याय उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, छत्तीसगढ मधील कॉंग्रेसचे आमदार ग्रामविकास मंत्री टी एस सिंह देव यांनी शनिवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. ते मुख्यमंत्री पदाची देखील इच्छा बाळगून होते. टी एस सिंह देव यांना विश्वासात न घेता पंचायत राज मंत्री निर्णय घेत होते त्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
टी एस सिंह देव यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयामुळे छत्तीसगढ मधील राजकीय वातावरणात चर्चांना उधान आलं आहे. तेथील कॉंग्रेसची स्थिती महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणे होईल की काय अशी चर्चा आहे.