चिंतन आणि आचरण

राहुल गांधी यांनी तिसर्या आघाडीची आणि यूपीएच्या अध्यक्षपदासाठीची प्रादेशिक पक्षांची जी विचारसरणी होती ती संपुष्टात आणली. भाजप आणि काँग्रेस यांच्याशिवाय आणि यांच्यामध्येच संघर्ष होऊ शकतो. हे सांगून प्रादेशिक पक्षांच्या राजकीय विस्ताराच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी यांना राहुल गांधी यांच्या विचारांवर आता चिंतन करण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनंतर २४ तासांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत त्यांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. मुळात प्रश्न असे ताकदीचे नसल्यामुळे उत्तर देणे अवघड नव्हते. त्यातूनही देवेंद्र फडणवीस यांनी जी उत्तरे दिली ती शिवसेनेच्या नेत्यांना सहन करण्याजोगी नव्हती. भाषणानंतर शिवसेनानेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता हे अधोरेखित झाले.
खरेतर उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक मुद्द्यांवर फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करायला नको होते. मात्र त्यांनी भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांना लक्ष्य करीत स्वतःवर टीका टिप्पणीचा पलटवार मागून घेतला. आता आगामी दोन-तीन दिवस उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे विरोधकांचे थेट लक्ष्य राहील. देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी झालेल्या सभेनंतर ठाकरे-फडणवीस यांच्या सभेची तुलना होणे क्रमप्राप्त आहे. ठाकरे यांच्या भाषणात जे नव्हते ते सर्व फडणवीस यांच्या भाषणात होते.
एवढ्या एका वाक्यातच सभेचा लेखाजोखा मांडता येईल. बाबरी ढाचा पाडण्यामध्ये फडणवीसांचे योगदान काय, त्यांचे वजन किती त्यावेळी ते किती वर्षांचे होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वातंत्र्यसंग्रामात भूमिका काय? खरे हिंदुत्व कोणाचे, महाराष्ट्र राज्याचे बाप कोण, भाजप महाराष्ट्रापासून मुंबई कशी तोडणार, असे प्रश्न उपस्थित करीत व काही प्रश्नांना उत्तरे देत ठाकरे यांनी फडणवीस यांची मस्करी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला उत्तर देत उद्धव ठाकरे यांचे ज्ञान तोकडे असल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला झालेली गर्दी आणि त्याचे मतांमध्ये होणारे रूपांतर हे नक्की आहे. जर सभेला सच्चे शिवसैनिक आणि त्यांचे परिवार आले असतील तर. शिवसेनेची ती मते नक्की आहेत आणि ती त्यांना कोणत्याही निवडणुकीत पडणारच आहेत. मात्र काल हिंदी भाषक मंडळींपुढे फडणवीस यांनी केलेले भाषण या मंडळींसह त्यांच्या परिवारांची मते भाजपमध्ये नव्याने रूपांतरित होणारी आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत मुंबई कोणाच्या ताब्यात राहील, यासाठी ही आणि यासारखी प्रांताप्रांतातील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्याअनुषंगाने व्यूहरचना अमलात आणायला सुरुवात केली आहे. तर शिवसेनेने ती मते आपल्या हातांनी दूर केली आहेत. हिंदुत्वाच्या घोटाळ्यात शिवसेना अडकली आहे.
खरे आणि खोटे हिंदुत्व यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना कितपत यश येईल, हेही अधांतरी झाले आहे. हनुमान चालिसा हा प्रचाराचा मुद्दा होत असताना मशिदींवरील भोंगे यालाही त्यांनी प्रचारामध्ये उतरविले आहे. एकूणच कालची फडणवीस यांची सभा मुंबईच्या मतदारांमध्ये जोष निर्माण करणारी होती. अनेक मुद्द्यांचा परामर्श घेणारी होती. मात्र महापालिकेतील भ्रष्टाचारापासून मुंबई वेगळी करणार एवढा एक मुद्दा सोडला तर, मुंबईच्या भल्यासाठी, मुंबईकरांसाठी भारतीय जनता पक्ष काय करणार, याचा अगदी वरवरचा आढावासुद्धा फडणवीस यांनी घेतला नाही किंवा त्याच्या रुपरेषेची झलकही संगतीला नाही.
गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोर लावला असता तर, महापालिका ताब्यात घेता आली असती. या वेळी नक्कीच भाजप महापालिकेवर वर्चस्व मिळवेल. कालचा दिवस आणि एका अर्थाने महत्त्वाचा होता तो म्हणजे भारतातील तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी. उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेस महत्त्वपूर्ण निर्णय घेईल, असे वाटत होतेच, मात्र अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल, असाही अंदाज होता. परंतु या नवसंकल्प शिबिरात अध्यक्षपदासाठी उत्सुक कोणीच नसल्याचे स्पष्ट झाले. युवकांच्या हातात काही प्रमाणात पक्षाचे नेतृत्व देण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला. पण हे करत असताना संसदीय मंडळाच्या पुनर्स्थापनेची सूचना कार्यसमितीने फेटाळून लावली. साहजिकच पक्षातील जुन्या-जाणत्या नेत्यांच्या जी-२३ गटाची मूलभूत मागणीच रद्दबातल ठरवल्याने ही मंडळी नाराज असतील. तरुणांना ५० टक्के पदे देण्याचा निर्णयाचे स्वागत झाले असले तरी, काँग्रेसला आता पक्षाच्या ध्येयधोरणांचे आणि तत्त्वांचे आकर्षण युवकांच्या मनात निर्माण केले पाहिजेत.
महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाल्यास युवकांना संघटित करून काँग्रेसच्या छताखाली मजबुतीने संघटित करेल, अशा नेतेमंडळींची फळी सध्या तरी दिसत नाही. राष्ट्रीय पातळीवर जी फळी आहे त्या फळीला काम करण्याची मोकळीक देणे गरजेचे आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस यशस्वी झाली नाही त्यातील शिंदे तर, थेट भाजपमध्ये डेरेदाखल झाले. एकेकाळी राहुल गांधी यांच्या अवतीभोवती असणारी यंग ब्रिग्रेड आता दिसत नाही. या सगळ्याचा विचार चिंतन शिबिरामध्ये करून त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आम्ही वारंवार भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्षच विचारधारेच्या जोरावर देशभरात अस्तित्वात राहतील आणि त्यांच्या छत्रछायेमध्ये प्रादेशिक पक्ष विविध राज्यांमध्ये काम करतील, असे म्हटले होते.