“मोदी सरकारचं लीकतंत्र तरुणांसाठी घातक”; युजीसी नेट परीक्षेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल
मंगळवारी (१८ जून) झालेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केलाय. पेपर फुटल्याचा संशय असल्यानं तसेच या परीक्षेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर यावरुन आता काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी सरकारचे लीकतंत्र तरुणांसाठी घातक असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले आहे.
पेपरफुटी थांबवण्याची जबाबदारी घ्या
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही परीक्षेवर खूप चर्चा करता. पण आता नीट परीक्षेची चर्चा कधी करणार? युजीसी नेट परीक्षा रद्द करणं हा मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. तर लाखो विद्यार्थ्यांचा विजय आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वी नीटमध्ये कोणताही पेपर फुटला नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, बिहार, गुजरात आणि हरियाणामध्ये शिक्षण माफियांना पकडण्यात आलं. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी पेपर फुटल्याचं मान्य केलं. नीट परीक्षा कधी रद्द होईल? पंतप्रधान मोदींनी नीट परीक्षेतही त्यांच्या सरकारची हेराफेरी आणि पेपरफुटी थांबवण्याची जबाबदारी घ्यावी.”
हेही वाचा- नितीश कुमार सरकारला हायकोर्टचा मोठा झटका; बिहारमधील ६५ टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द
भाजपा सरकारचे लीकतंत्र आणि भ्रष्टाचार तरुणांसाठी घातक
या निर्णयानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, “भाजपा सरकारचे लीकतंत्र आणि भ्रष्टाचार तरुणांसाठी घातक आहे. नीट परीक्षेत घोटाळ्याची बातमी आल्यानंतर आता १८ जून रोजी होणारी नेट परीक्षाही अनियमिततेच्या भीतीने रद्द करण्यात आली आहे. आता जबाबदारी निश्चित होणार का? या निकृष्ट व्यवस्थेची जबाबदारी शिक्षणमंत्री घेणार का?”, असा सवालही त्यांनी केला आहे.
परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे
शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा पुन्हा नेमकी कधी होईल, यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. पेपर फुटीच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही शिक्षण मंत्रालयानं सांगितलंय. याप्रकरणात जी कुणी व्यक्ती दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, १८ जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये १२०० हून अधिक केंद्रावर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
One Comment