पु. लं. चा हाेता पुढाकार
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान भूषविणार्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती करायचे ठरल्यापासून त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वास्तूचे बांधकाम करणार्या कारागिरांना वेळोवेळी पुलंचे मार्गदर्शन लाभले. १९६२ मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि १९६८ मध्ये ती बांधून तयार झाली. या कालावधीत जातीने वास्तूला भेटी देऊन, रंगमंच, आसनव्यवस्था, नाटकासाठी लागणार्या इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून, ’पुलं’नी या नाट्यगृहाला पुण्याच्या वैभवात भर घालणारी वास्तू म्हणून उभे केले.
केवळ बालगंधर्वची वास्तू नाही, तर आजूबाजूचा परिसरही वेगवेगळ्या कलांसाठी समर्पित असावा, अशी ’पुलं’ची भावना होती. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, त्यांनी वास्तूच्या जडणघडणीवर जातीने लक्ष ठेवले होते. एखाद्या कलाकाराचा या वास्तूच्या निर्मितीत सहभाग असायला हवा, असा ’पुलं’चा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी ’बालगंधर्व’ची संकल्पना मांडून, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत भरीव योगदान दिले. या नाट्यगृहाच्या माध्यमातून पुलंनी पुणेकरांना एका सांस्कृतिक केंद्राची भेट देऊन, पुढील अनेक वर्षे येथील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली.
असंख्य नाट्यकृती या बालगंधर्व रंगमंदिरात बहरल्या. संगीताचे कार्यक्रम, मैफली, लावण्या, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध संमेलने या ठिकाणी झाली. असंख्य कलाकारांनी या रंगभूमीवरून कलेची सेवा केली. पण आज मात्र हीच एेतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारी वास्तू राजकीय महत्त्वाकांक्षेपायी पाडण्याचा डाव काही राजकीय मंडळी आखत आहेत.