कॉर्पोरेट कंपन्यांचे पगार – इन्सेंटिव्ह दिवाळीनंतरच

बाजारावर परिणाम : सणावर आततायीपणाचे सावट
पिंपरी : दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक अनपेक्षित बाबी घडताना दिसत आहेत. कॉर्पोरेट आणि आयटी कंपन्यांनी आपले आडमुठे धोरण कायम ठेवले असून, पगार २७ ते ३० तारखे दरम्यानच करण्याचे निश्चित केले आहे. तसेच दर तीन महिन्यांनी मिळणारा इन्सेंटिव्ह देखील त्याच वेळी देण्यात येणार आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीपूर्वी शहरातील हजारो नोकरदारांची दिवाळी ऐन महिनाअखेरीला आली आहे. दुसरीकडे इतर नागरिकांना दिवाळीपूर्वी बोनस किंवा व्यवसायातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न लक्षात घेत महापालिकेने मिळकत कराची थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेतली आहे. यामुळे एकंदरीतच दिवाळीच्या सणावर व्यवस्थापन आणि यंत्रणांच्या आततायीपणाचे सावट दिसू लागले आहे.
कॉर्पोरेट आणि आयटी कंपन्यांमध्ये २७ ते ३० तारखेदरम्यान पगार होतात. या कंपन्यांना दिवाळीशी काहीही सोयरसुतक नसल्याने दिवाळीत बोनस दिला जात नाही. दर तीन महिन्यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या आधारे इन्सेंटिव्ह दिला जातो. जो या महिन्यात मिळणार आहे. कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती, की कंपन्या दोन-चार दिवस आधी पगार आणि इन्सेंटिव्ह देतील. परंतु कंपन्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले.
या बड्या कंपन्यांमध्ये काम करणार्यांना पगारही मोठे असतात. परंतु वेगवेगळे हप्ते, गुंतवणुकीचे नियोजन असते. यामुळे दिवाळी जोरात साजरी करता येईल, एवढी रक्कम अनेकांच्या हाती नाही. याचा थेट फटका बाजारावर पडला आहे.
लहान-मोठ्या सर्व मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी मात्र दिवाळीची तारीख ध्यानात घेत पगार आणि बोनसचे नियोजन केले आहे. या वर्गामुळे बाजारात काहीशी तेजी दिसत आहे. परंतु शहरातील अनेकांकडे अतिरिक्त रक्कम आली आहे. ही बाब लक्षात घेत महापालिकेने आपली सहाशे कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. दसऱ्याच्या आधीपासूनच पालिकेने वसुली सुरू केली. आधी उद्योगांना सील करत औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर आता निवासी सदनिकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त वसुली व्हावी, या अपेक्षेने महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ३ लाख ६० हजार मिळकतधारकांकडे थकबाकी आहे. ही थकबाकी दिवाळीच्या निमित्ताने पालिकेला वसूल करायची आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ई-कॉमर्स कंपन्या खूपच आक्रमकपणे फेस्टिव्हल सीझनचे मार्केटिंग करतात. परंतु त्यांचा मुख्य ग्राहक असलेले आयटीयन्स आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात शिल्लक रक्कम राहणार नसल्याचे लक्षात घेत आखडता हात घेतला अाहे.