शाब्बास भले! चक्क उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अन् PSI अधिकाऱ्यांची घरे फोडून चोरी..
चाकूर : (Crime news latur) लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या शासकीय निवासस्थानांमधील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तीन पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी राहतात.
तहसील कार्यालयाच्या जवळ शासकीय निवासस्थानात विविध विभागाचे चाळीस अधिकारी व कर्मचारी राहतात. शनिवारी व रविवार या दोन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अनेकजण कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानात प्रवेश केला व ज्याच्या घराला कुलुप नाही त्याचे दरवाजे बाहेरून बंद केले.
ज्या घरांना कुलूप लावलेले होते त्या घरात चोरट्यांनी हात साफ केला. याठिकाणी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे. सकाळी कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.
या निवासस्थानी तीन पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी राहतात. तरीही चोरट्यांनी याठिकाणी चोरी केली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन श्वानपथक व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले होते. काही घरातून चोरट्यांनी सोने, चांदीने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
दरम्यान, चोरी प्रकरणाचा तपास पोलिस करती असून याबाबत दुपारपर्यंत ही याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. उपजिल्हाधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.