दिवाळी देतेय गृहउद्योग, बचतगटांना बळ
पिंपरी : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. हा सण सर्वांनाच आनंद देऊन जातो. सोबतच या सणाच्या माध्यमातून कष्ट करणाऱ्यांना बळही मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीसाठी तयार फराळाला अधिक मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक महिला सरसावल्या आहेत. दिवाळीचे पदार्थ तयार करुन विकण्यासाठी सोशल मीडियाने त्यांना एक व्यासपीठ दिले आहे. एकट्या महिलेने सुरू केलेला हा सीझनल व्यवसाय आता अनेक घरांसाठी गृहउद्योग बनला आहे. गोड-तिखट अशा वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध आता सर्वत्र दरवळत आहे आणि अनेक हातांना कामही देत आहे. पूर्वी दिवाळी जवळ येताच प्रत्येक घरात दिवाळीचे पदार्थ बनविण्याची लगबग घरोघरी असायची. मात्र अलिकडे पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने त्यांना हे पदार्थ बनविणे शक्य होत नाही. त्यांना तयार फराळ घ्यावा लागतो. त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी अनेक गृहिणी सरसावल्या आहेत. नागरिक देखील स्वीटमार्ट ऐवजी गृहिणी आणि महिला बचत गटांकडून फराळ घेण्यासच प्राधान्य देत आहेत.
यात सोशल मीडिया खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गृहिणी आणि बचत गट आपल्या उत्पादनाची अत्यंत आकर्षक जाहिरात करुन वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसब्रुक ग्रुपवर टाकत आहेत. अनेक महिला आणि बचत गटांना केवळ वैयक्तिच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यालय, संस्था आणि उद्योगांकडून देखील ऑर्डर मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस सोबत चॉकलेट, ड्रायफ्रूट आणि मिठाई ऐवजी भारतीय फराळ देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवाळी फराळ तयार करणाऱ्या बचत गटांकडे आगाऊ नोंदणी केली जाते. नोंदणीनुसार बचत गटांकडून फराळ तयार केला जात आहे.
तयार करण्यात आलेले पदार्थ खराब होणार नाहीत, याची खबरदारी बचत गटांकडून घेतली जात आहे. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, असे अनेक पदार्थ तयार केले जात आहेत. यंदा पदार्थ महागले दिवाळीमुळे डाळींना जास्त मागणी असल्यामुळे सर्वच प्रकारच्या डाळींच्या भावात क्विंटलमागे 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तुंच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा फराळही महागला आहे.