सावधान! पुणे शहरात सायबर फसवणूकीचे प्रकार वाढले, ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा गंडा
पुण्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरट्यांकडून शेअर बाजार, टास्क तसेच जादा परतावा देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळले जात असून, पुन्हा शहरातील ५ नागरिकांची तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे.
सायबर चोरट्यांकडून नवनवे ‘डाव’ टाकत पुणेकरांना फसविले जात असतानाच एका ५९ वर्षीय आयटी इंजिनिअरला मनी लाँड्रींगच्या प्रकरणात कारवाईत “डिजीटल ॲरेस्ट” दाखवून तब्बल ६ कोटी २९ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
केवळ दहा दिवसात हे पैसे उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ५९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी फसवणूक, आयटी ॲक्टसह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पाषाण परिसरात राहण्यास आहेत. ते एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांची मुलगी आणि ते असे दोघेच घरी असतात. सहा महिन्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. दरम्यान, त्यांना व्हॉट्सअप क्रमांकावरून ९ नोव्हेंबर रोजी एका फोन आला. आम्ही सीबीआयमधून बोलत असून, तुमच्या नावाने मनी लाँड्रींग होत आहे. त्यात तुमचे नाव आले आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्या सर्व बँक खाते तपासावे लागतील असेही सांगितले. त्यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याचवेळी त्यांना तुम्हाला ‘डिजीटल ॲरेस्ट’ केले आहे. त्यामुळे तुम्ही याप्रकरणाबाबत कुटूंब किंवा इतर कोणाशीही बोलू नये, तसेच इतर कोणाला माहिती देऊ नये, असे सांगत धमकावले. त्यामुळे त्यांनी याबाबत कुटूंबातील कोणालाही काहीही सांगितले नाही.
सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यावर दहा दिवसात तब्बल ६ कोटी २९ लाख रुपये उकळले. सातत्याने वेगवेगळी कारणे देऊन सायबर चोरटे पैसे मागत होते. तक्रारदारांकडील पैसे संपल्याने त्यांनी तसे सांगितले देखील. पण, त्यांना आणखी ७ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी याबाबत मुलीला याची माहिती दिली. त्यावेळी मुलीने हे फ्रॉड असल्याचे त्यांना सांगत तक्रारदार यांच्या मोठ्या बहिणीला याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून संबंधित बँक खाते व मोबाईल धारकांची माहिती गोळा केली जात आहे. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.