दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या मुलाला सायबर चोरट्यांचा फोन; पोटनिवडणुकीत…

पुणे | भारतीय जनता परतीच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवून देण्याचे आमिष दाखवणारा एक फोन आल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी कुणाल यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याने याबाबत टिळक यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून प्रयत्न सुरू असले तरीही भारतीय जनता पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.
भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्यानंतर यांचे पती शैलेश टिळक, चिरंजीव कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. कुणाल यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधून उमेदवारी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. सायबर चोरट्याने पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. कुणाल यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, याप्रकरणी अद्यापही कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.