चित्रप्रदर्शनातून घडणार अक्षरविठ्ठलाचे दर्शन

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त कॅलिग्राफी कलाकार सुमित काटकर यांच्या पहिल्या कॅलिग्राफी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अक्षरविठ्ठल’ ही या प्रदर्शनाची संकल्पना असून, प्रदर्शनात पुणेकरांना अक्षराच्या माध्यमातून विठ्ठलाची विविध रूपे पाहायला मिळतील. हे प्रदर्शन ५ जुलै ते १० जुलै या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीमधील पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. फाइन आर्ट्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आणि गेली दहा वर्षे जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकार सुमित काटकर यांनी ‘कॅलिग्राफी’ विषयात प्रावीण्य मिळविले आहे.
त्यांनी कॅलिग्राफीविषयक विविध कार्यशाळांसाठी मार्गदर्शन केले आहे. अक्षरांमधून विट्ठलाची विविध रूपे साकारत त्यांनी तब्बल ५० ते ६० चित्रे रेखाटली असून, ही सर्व चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन भरविण्याची कल्पना दोन वर्षापूर्वीच सुचली होती. मात्र कोरोनामुळे कलाप्रदर्शन भरविण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र परिस्थिती सुधारल्याने आणि योगायोगाने आषाढी एकादशीच्या वेळीच कलादालन उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन भरवित असल्याचे काटकर यांनी सांगितले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी, लेखक आणि गीतकार वैभव जोशी यांच्या हस्ते पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी येथे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दाभाडगाव, नोवेल इंटरनॅशनल स्कूल आणि कलारंग कला संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, अतुल इनामदार यावेळी उपस्थित होते.