क्राईमताज्या बातम्यापुणे

दोन दिवसांपासून खोली बंद, त्याठिकाणी आढळले 2 मृतदेह; लोहगावमध्ये नेमकं घडलं तरी काय?

पुणे | पुण्यातील लोहगाव परिसरात एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घातली आहे. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आहे. दरम्यान हा प्रकार खूनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

किरण बोबडे (वय 23) आणि आरती बोबडे (वय 20, दोघे रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव) अशी मृतदेह आढळलेल्या दोघांची नावे आहेत. सोमवारी (ता. 6) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लोहगाव वडगाव शिंदे रोड लेक व्ह्यू सिटी या सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरातून वास येत असल्याचे घरमालक प्रशांत यादव यांच्या निदर्शनास आले. ते वरच्या तर बोबडे दाम्पत्य खालच्या मजल्यावर राहत होते. त्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता किरणचा मृतदेह छताच्या हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला तर पत्नी आरती ही बेडवर मृत अवस्थेत मिळून आली. तिचा मृतदेह कुजण्यास सुरूवात झाली होती. शनिवारी सकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या. त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. किरण हा पोस्टात कंत्राटी नोकरी करत होता. तो मुळचा माजलगाव बीड येथील राहणार आहे. तर पत्नी आरती ही येरवड्यातील असून एका खासगी बँकेत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला असून पाच महिन्यांपासून ते या ठिकाणी भाड्याने राहण्यास आल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये