झाडावर बिबट्या आणि खाली तरुणीचा मृतदेह; अजिंक्यतारा किल्ल्यावर धक्कादायक घटना
सातारा | शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन युवतीबद्दल खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन युवतीचा सडलेल्या अवस्थेतला मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडला आहे. या युवतीचा मृतदेह खाल्लेल्या बिबट्याचाही तिथेच मृत्यू झाला आहे. युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच असलेल्या एका झाडावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे, त्यामुळे या घटनेचं गूढ वाढलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर एका झाडावर मृतावस्थेत बिबट्या आणि खाली मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर बिबट्यामुळे वन विभागाच्या पथकलाही पाचाराण करण्यात आले होते. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर बिबट्याचे पिल्लू असल्याचे आढळले असून हे पिल्लू ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे तपासात आढळले. बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
तर मृत मुलगी ही नागठाणे परिसरातील असून ती १७ वर्षांची आहे. ती गेल्या २० वीस दिवसांपूर्वी बेपत्ता होती. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडून उग्र वास येत असल्याचे काही नागरिक किल्ल्यावर गेले. या ठिकाणी त्यांना एका झाडाखाली तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला. तर झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळला.
एकाच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल शिरोळे, सुजित भोसले, इरफान पठाण, पंकज मोहिते आदी घटनास्थळी गेले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बिबट्याचा झाडाच्या दोन्ही फांद्यांमध्ये अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच दोघांच्याही मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. घटनास्थळी तरुणीचे कपडे, पैंजण, पाण्याची बाटली, बॅग सापडली आहे. ही बॅग व पाण्याची बाटली कुरतडली असून हा प्रकार बिबट्याने केला की दुसऱ्या कोणत्या प्राण्याने केला आहे याचा देखील तपास सुरू आहे.