बीड : (Death of Vinayak Mete) रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व स्तरातील नागरीकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात येत आहे. एकदा विनायक मेटे यांनी बोलताना शरद पवारांचा हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, राज्यातल्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता मेघे यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यात येणार होतं. त्यामुळे त्यांना आमदार करणं, गरजेचं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीतलं कोणीही तेव्हा मेघेंसाठी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार नव्हतं. तेव्हा मी विधान परिषेदेचा आमदार होतो.
शरद पवार हे त्यावेळी अमेरिकेत होते. त्यांनी तिथून फोन करुन सांगितलं की, विनायक मेटे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. त्यावर मी म्हणालो की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही सांगाल तेच होईल. असं म्हणत कोणताही विचार न करता दुसऱ्या क्षणात राजीनामा दिला. त्यांचा हा किस्सा त्यावेळीही चांगलाच गाजला होता. असे अनेक किस्से मेटेंच्या राजकीय कारकिर्दीत घडले आहे.