“मी गर्दीच्या ठिकाणी कधीही चाकूने वार करणार…” नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
अमरावती | Navneet Rana – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनीत राणा यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी कधीही चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी त्यांना देण्यात आली असून याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुदे यांनी राजापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 16 ऑगस्टपासून नवनीत राणा यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्यक्ती संपर्क साधत होती. यावेळी त्या व्यक्तीनं मी गर्दीच्या ठिकाणी कधीही चाकूने वार करणार हे माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि 504, 506 (ब) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसंच सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, नवनीत राणांना गेल्या वर्षीही हनुमान चालिसा पठण केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.