“आदित्य ठाकरे आले की आम्ही खुर्चीवरुन उठतो कारण…”, दीपक केसरकरांचा टोला

मुंबई | Deepak Kesarkar On Aditya Thackeray – शिवसेना नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी निशाणा साधला आहे. शिवसैनिक दुर गेले म्हणून यात्रा सुरू केल्या. याआधी अशा गाठीभेटी घेतल्या नाहीत. आता वेगवेगळ्या यात्रा काढत आहेत, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज (शुक्रवार) मनमाडमध्ये येणार आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसं वागावं, बोलावं याचं उद्धव ठाकरेंचं उदाहरण त्यांनी घ्यावं, असा सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला. तसंच, आदित्य ठाकरे निम्म्या वयाचे आहेत. मात्र, ते आले की आम्ही खुर्चीवरुन उठतो कारण त्यांच्या आजोबांना आम्ही मान देतो, असं देखील केसरकर म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी ‘शिवसैनिक असते, तर हिमतीने उभे राहिले असते. आम्ही उठाव व बंड केले असं ते म्हणत आहेत. पण, तो बंड-उठाव नव्हता. ती गद्दारी होती. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. ते महाराष्ट्रात थांबले असते. सुरत आणि तेथून गुवाहाटीला पळून गेले नसते. अशी टोलेबाजी शिंदे गटावर केली होती.