‘अजित दादांचं वय लहान, त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी पुढच्या काळातच’; शिंदे गट
सिंधुदुर्ग : (Deepak Kesarkar On Ajit Pawar) ‘आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. सध्या अजितदादांचं (Ajit Pawar) वय लहान आहे. त्यामुळे पुढच्या काळात त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नक्कीच मिळू शकते,’ असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलंय. दरम्यान राज्यात सध्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदावरुन बऱ्याच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यातच अनेक ठिकाणी अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असलेल्या आशयाचे बॅनर देखील बऱ्याच ठिकाणी लागले असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान केसरकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर शिंदे गटाकडून पूर्णविराम देण्यात आल्याचं चित्र आहे. राज्यात सध्या पवार घरातून सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोन मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून कायमच चर्चेत असतात. त्यातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुकत्याच एका कार्यक्रमात दादांनी मुख्यमंत्री व्हावं असं आशाताईंनी जाहीरपणे म्हटलं होतं. त्यावरच शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
‘मी 1957 पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं सगळ्यांना वाटतं. तसंच आई म्हणून माझ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं. माझं वय आता 84 झालं आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल’, अशी इच्छा अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा कायम व्यक्त केली जाते. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी आमदार प्रार्थना करत असल्याचं वृत्तही अनेकदा समोर येतं. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना बरचं उधाणं येतं. त्यातच आता अजित पवारांच्या मातोश्रींनीच मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्ती केली आहे.