ठाकरेंनी मैदान मारल्यानंतर; शिंदे गटची आणखी एक माघार!

मुंबई : (Deepak Kesarkar On Uddhav Thackeray) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील वादावर शुक्रवार दि. 23 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका देत, शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र, यानंतर शिंदे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बंडखोर आमदारांकडून सांगण्यात येत होतं.
दरम्यान, यावर कोल्हापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. केसरकर यांनी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. आम्हाला परवानगी हवी असती तर आमच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळाली असती. परवानगी आधी कोणी मागितली त्यावर हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आम्हाला हा न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
पुढे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेबदल मला बोलायचं नाही. मला कोणाशी वाद घालायचं नाही, मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे, असं ते म्हणाले.