“उगाच कळ काढु नका”; दीपाली सय्यद यांचा भाजपवर निशाणा!

मुंबई | Deepali Sayed On BJP – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसमोरचं आव्हान आता उद्धव ठाकरे कसं पेलणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये न जाता अजूनही आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरेच आमचे पक्षप्रमुख असल्याचं ठामपणे सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेमकं पुढे काय होणार आहे? यावरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दीपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असं नमूद केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातली शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. एकनाथ शिंदेंनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका”, असं दीपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये दीपाली म्हटलं आहे.
“भाजप आमची शत्रू नाही. त्यांच्याविरूद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण भाजपने याची दखल घेणं गरजेचं आहे”. असं देखील दीपाली सय्यद म्हणाल्या.