मुंबई | Deepesh Bhan Dies – ‘भाबीजी घर पर है’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील अभिनेते दीपेश भान यांचं शनिवारी सकाळी निधन झालं आहे. क्रिकेट खेळत असताना ब्रेन हॅमरेजच्या अटॅकमुळे त्यांचं निधन झालं. ते 41 वर्षांचे होते.
भान हे ‘भाबीजी घर पर है’ शोच्या सुरुवातीपासून मलखानची भूमिका करत होते. त्यांचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते आसिफ शेख यांनी भान यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं उघड केलं. शेख यांच्या म्हणण्यानुसार, ‘भान सकाळी सातच्या सुमारास जिममध्ये गेले आणि दहिसर येथील त्यांच्या इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळण्यासाठी थांबले. खेळतानाच अचानक खाली पडले, त्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचताच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.’
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,’ भान यांच्या डोळ्यांतून रक्त येत होतं, हे ब्रेन हॅमरेजचं स्पष्ट लक्षण आहे.’ डॉक्टर म्हणाले “हा ब्रेन हॅमरेजचा खात्रीशीर शॉट आहे. भान यांनी सकाळी काही खाल्लेलं नसावं, आणि क्रिकेट खेळताना जास्त थकवा आला असावा त्यामुळं ब्लडप्रेशर वाढलं. आणि ते ताबडतोब खाली पडले”.