सिटी अपडेट्स

आघाडीच्या दबावतंत्रामुळे त्यांच्या उमेदवाराचा पराभव

सातारा ः महाविकास आघाडीने दबावतंत्र वापरून त्यांच्या उमेदवारांना कोंडून ठेवले होते हे तंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला, असा आरोप भाजपचे नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सातार्‍यात केला. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मुंबईवरून कोल्हापूरला जात असताना सातारा शहरात चाहूर येथील हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह व महामार्गावरील हॉटेल राजेशाही येथे त्यांचे उदयनराजे युवा मित्र समूह आणि सातारा जिल्हा भाजप व कार्यकारिणीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. उदयनराजे मित्र समूहाचे सक्रिय सदस्य व युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी त्यांचे पेढ्यांचा हार घालून स्वागत केले.

तत्पूर्वी चाहूर येथे भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार आदी सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाडिक यांचे स्वागत करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आपल्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजप या निवडणुकीमध्ये अत्यंत खुलेपणाने प्रक्रियेला सामोरा गेलेला पक्ष आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे उमेदवार त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघांमध्ये खुलेपणाने फिरत होते. पक्षीय बलाबल, तसेच राजकीय परिस्थिती याचा अंदाज चाणाक्षपणे घेत विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वापरलेल्या रणनीतीचा निश्चितच फायदा झाला. मात्र महाविकास आघाडीने दबावतंत्राचा वापर करून आपल्या उमेदवारांना एका विशिष्ट ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवले होते.

हे दबावतंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राजकारणातल्या या तंत्रामुळे त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. आमच्या नेत्यांनी अत्यंत चाणाक्षपणे राजकीय परिस्थिती हाताळत शेवटपर्यंत दाद मागितल्याने परिस्थिती सोपी झाली. या विजयाचे श्रेय पक्षाला आणि आमची प्रचार यंत्रणा राबवणार्‍या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित आहे. यापुढे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील मोर्चेबांधणीमध्ये पक्षआदेशाप्रमाणे कायमच माझे सक्रिय योगदान राहील, असे स्पष्ट आश्वासन यावेळी धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. संग्राम बर्गे मित्र समूहाच्या वतीने धनंजय महाडिक यांचा पेढ्यांचा हार घालून विशेष सत्कार करण्यात आला.

संग्राम बर्गे यांनी धनंजय महाडिक यांच्या या विजयाबद्दल त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. चाहूर येथील महिंद्रा एक्झिक्युटिव्ह हॉटेल राजेशाही, तसेच कराड येथे कोल्हापूर नाका अशा विविध ठिकाणी महाडिक यांचे जंगी स्वागत झाले. कार्यकर्त्यांच्या उदंड प्रेमाने मी निश्चितच भारावलो असून, कार्यकर्त्यांना सातत्याने ताकद देण्याचे काम माझ्याकडून होत राहील. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या उभारणीत संघटन मजबुतीकरणाचे काम यापुढे अहोरात्र करणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योजक संग्राम बर्गे यांच्यासह नगरसेवक धनंजय जांभळे, गणेश भिसे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये