पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू, झिकाचे थैमान
पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचे ३ रुग्ण असून डेंग्यूचे ६२ रुग्ण झाले आहेत.महापालिकेच्या परिसरात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुण्या व झिका या आजारांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता पावसाळयाच्या दिवसामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराच्या प्रतिबंधाकामी पिंपरी-चिंचवड महापालिकेने “ डेंग्यु मुक्त पीसीएमसी मोहिमेची सुरुवात केलेली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यू आजाराचे ६३ रुग्ण, चिकुनगुण्याचे ८ रुग्ण व झिका आजाराचे ३ रुग्ण आढळुन आलेले आहेत. या रुग्णांपैकी १ रुग्ण गर्भवती महिला आहे. तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी,डोळयांच्या मागे दुखणे इ. त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. घरातील भांड्यात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एकदा साफसफाई करावी. लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.