ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

अजित पवार म्हणाले, जागावाटपावर चर्चा नाही; फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले; कोणाला किती जागा?

मुंबई : (Devendra Fadanvis On Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम स्वरुप देतील, असं फडणवीस म्हणाले. भाजप २६ जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. असं झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा मिळतील.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच जागावाटपाबद्दल महत्त्वाचं विधान केलं होतं. सध्या अन्य राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाबद्दल आता चर्चा झालेली नाही, असं अजिच पवार गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर म्हणाले होते. पण आता फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल आकडेवारीसह भाष्य केलं आहे.

भाजप लोकसभेच्या २६ जागा लढेल. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून २२ जागा लढवतील, असं फडणवीसांनी सांगितलं. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं २३ जागांवर उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपनं २३ आणि सेनेनं १८ जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत २३ जागा लढवणाऱ्या शिवसेनेला यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत २२ जागा वाटून घ्याव्या लागतील.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली महायुती एकजूट आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. राज्यात नेतृत्त्व बदलाचा कोणताही विचार नाही. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी माझ्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढेन, असं फडणवीस म्हणाले. राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. राज्यात महायुतीला ४० ते ४२ जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये