आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ”त्यांनी डोळ्याला पट्टी लावली आहे, अन्…”
मुंबई : (Devendra Fadnavis On Aaditya Thackeray) बारसू रिफायनरीत गुंतवणूक करणारी सौदी आराम्को ही कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुजोरा दिला. बारसू रिफायनरीला उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांबरोबर जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असून, पाकिस्तानला तिचा फायदा होणार आहे.
यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत, सरकारवर जोरदार टिकास्त्र डागलं होत. ते ट्विटमध्ये म्हणाले की, “नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, हे वारंवार दिसतंच. त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?”
“‘पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग’ अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत. उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!,” अशी टीका आदित्य असं ट्विट त्यांनी केलं होत. हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं अन् त्यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्तुत्तर दिलं आहे.
“किमान आदित्य ठाकरे अभ्यास करून किंवा भाषण ऐकून बोलतील, असं मला वाटत होते. पण, आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधलीय आणि विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय?” अशी टीका फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.