राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग; शिरुरमध्ये फडणवीसांचा ‘हा’ शिलेदार मैदानात?

पुणे : (Devendra Fadnavis On Ajit Pawar) शरद पवारांनी राजकारणाची सुरुवाद केली अन् त्यानंतर कालांतराने पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जावू लागला. आजही जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र, येत्या निवडणुकांत यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपकडून राष्ट्रवादीला आव्हान दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यातच आता शिरूरची जागाही राष्ट्रवादीकडून हिसकावण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांना तुल्यबळ असा विरोधक राहिला नाही, अशा चर्चा सुरू असताना भाजप नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका नेत्याच्या नावाची चर्चा आता मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
त्यामुळे येत्या काळात शिरूर तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे पाहायला मिळेल यात शंका नाही. अनेक राष्ट्रवादीत राहून सर्व डावपेच शिकलेले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले प्रदीप कंद यांचे नाव भाजपकडून घेतले जात आहे. प्रदीप कंद हे पेरणे -वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करतात. त्या गटात त्यांना मानणारा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. त्यामुळे जर भाजपकडून प्रदीप कंद यांनी जर उमेदवारी दिली तर भाजपकडून शिरूरसाठी पूर्ण ताकत लावण्याची शक्यता आहे.
प्रदीप कंद यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटात असणारी लोणीकंद ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व जागा निवडून आणत पक्ष नेतृत्वाला आपली चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे भाजपकडून सध्या तरी त्यांच्या नावाचाच विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात शिरुरची निवडणुक रंगतदार पाहायला यात तिळमात्र शांक नाही.