“त्यांची लाईन डेड आहे, म्हणून…”, फडणवीसांचा पवारांना खोचक टोला!
मुंबई : (Devendra Fadnavis On Ajit Pawar) मागील अडीच वर्षापासून राज्याच अनेक राजकीय घडामोडी, सत्तानाट्य आणि उलथापालत पाहायला मिळाली आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाची युती तुटली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा अनपेक्षित शपथविधी झाला, फडणवीसांचं कोसळलेलं सरकार, महाविकास आघाडीची सत्तास्थापना ते थेट गेल्या महिन्याभरात प्रचंड उलथापालथींनंतर शिंदे गट आणि भाजपाचं आलेलं सरकार. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा टोलेबाजी आणि रंगणारी कलगीतुरा कायमच चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत. त्या सर्व ठिकाणी काम सुरू झाले असते. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघचं सध्या राज्याचे मालक झाले आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार करून बाकीच्या आमदारांना का सामावून घेतलं जात नाहीत? मंत्रीमंडळात आणखी 40 मंत्र्यांना घेता येऊ शकतात. मात्र, त्यांची वर्णी लागताना दिसत नाही, असं म्हणत नेमकं मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी खोचक शब्दांत उत्तर दिलं.
निर्णय कुठेही थांबलेले नाहीत. मंत्रीमंडळ काय, लवकरच होईल. त्यात अडचण काहीच नाही. विरोधी पक्षनेत्याला विरोध करायचाच असतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. अजित पवारांच्या टीकेला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यांची लाईन डेड आहे. म्हणून त्यांना डेडलाईन हवीये. पण चिंता करू नका, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असा फडणवीसांनी यावेळी खोचक टोला लगावला.