मुंबई | Devendra Fadnavis On Mumbai Corporation Election – सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार आहे. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळ्या ठिकाणी भाजपचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करत असेल तर, आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असं माना. अभी नही तो कभी नही, आता केवळ एकच लक्ष मुंबई महानगरपालिका आहे,” असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
“आपल्या ‘मिशन मुंबई’साठी सर्वांचचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे. वॉर्ड रचना, प्रभाग रचना याचा विचार करुन चालणार नाही, पदाधिकाऱ्यांनी काम करत रहावं. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जनेतचा रोष आहे,” असंही फडणवीस म्हणाले.