भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे…”
मुंबई : (Devendra Fadnavis On Sambhaji Bhide) महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ते महानायक आहेत. अशा महामानवाबाबत बोलताना संयम पाळला पाहिजे. त्यांनी केलेलं विधान पूर्णपणे चुकीचं आणि निषेधार्ह आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली त्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यभरात भिडेंविरोधात संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.
‘अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी किंवा अन्य कोणीही करू नये. कारण करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे संताप तयार होतो. लोक महात्मा गांधी यांच्याबद्दल असं बोलणं कधीही सहन करून घेणार नाहीत. असंही फडणवीस म्हणाले आहेत.