आयोगावर टीका करणाऱ्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आपल्या बाजूनं निकाल दिला तर…”

मुंबई | Devendra Fadnavis On Shivsena – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे निर्देश दिले. या निर्णयाविरोधात शिवसेनेनं निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसंच आयोगाच्या निर्णयाविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आयोगानं आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांली संवाद साधत होते.

“निवडणूक आयोगानं शिवसेनेला पाहिजे तेवढी वेळ दिली. पण, वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कधीतरी त्याला सामोरं जावं लागतं. आयोगानं अंतरिम निर्णय दिला आहे, अंतिम नाही. त्यामुळे एखादे प्रकरण कमजोर असतं तेव्हा स्वायत्त संस्थांवर हल्ला करायचा ही शिवसेना, काँग्रेसची पद्धत आहे. आपल्या बाजूनं निकाल दिला तर उत्तम अन्यथा संस्थांविरोधात बोलायचं”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे .

दरम्यान, ठाकरे गटानं पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर शिंदे गटानंदेखील उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे.

Sumitra nalawade: