काँग्रेसमध्ये मतभेद! तरीही फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला अडबाले अस्त्राचे सुरुंग..
नागपूर : (Devendra Fadnavis On Sudhakar Adbale) नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झालेला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अडबाले यांनी भाजपला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस गटातटात विभागली असताना अडबाले यांनी विजयाची किमया केली. (Sudhakar adbale news in Marathi)
काँग्रेस पक्षात सुरू असलेला गोंधळ सातत्याने समोर येत आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीपूर्वी देखील असाच गोंधळ समोर आला होता. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पाठिंबा देण्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अल्टीमेटम दिलं होतं. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पदवीधर निवडणुकीसाठी राजेंद्र झाडे यांना महाविकास आघाडीचं समर्थन जाहीर करावं. अन्यथा प्रदेशाध्यक्ष पद सांभाळता येत नसेल त्यांना पदावरून हटवावं, अस आशिष देशमुख यांनी म्हटलं होतं.
नागपूर मतदारसंघात राजेंद्र झाडे हे विजयी होऊ शकणारे उमेदवार आहे, असं सांगतानाच देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांनी जे समर्थन जाहीर केलं, ते त्यांचं वैयक्तिक असून त्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं.
दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व असलं तरी माजी मंत्री, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजीत वंजारी असे पाच नेते, या सर्वांचेच वेगवेगळे गट होते. मात्र अडबाले यांनी या सर्व गटातील नेत्यांची मोट बांधली. एकंदरीतच अडबाले यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद बाजुला सारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडाला सुरुंग लावला.