शरद पवारांच्या राजीनाम्याची देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “टीआरपी कसा घ्यायचा याचं…”

पुणे | Devendra Fadnavis On Sharad Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर मिश्कील टिपण्णी देखील केली. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण शरद पवारांकडून घेतलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2 मे रोजी शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांची खोचक टोला लगावला आहे. “टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण शरद पवारांकडून घ्यावं लागेल. मी माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. त्यानंतर माझाच पक्ष ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यात फरक काय आहे?” असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला.
“एक गोष्ट लक्षात घ्या उसनं बळ घेऊन वाघ बनता येत नाही. वाघ हे दोन प्रकारचे असतात. एक सर्कशीमधला वाघ आणि दुसरा जंगलचा राजा. जर जंगलचा राजा व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःचं बळ लागतं” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.