उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; म्हणाले, “ज्या पक्षाने मला…”

मुंबई | Devendra Fadnavis Tweet – एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केलं आहे. शिंदे यांनी पुकारलेल्या या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडल्या. बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालयही ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान आज (गुरूवार) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर फडणवीसांनी एक ट्विट केलं आहे.
नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान ठेऊन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी ट्विटही केलं आहे.
‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.