धनंजय मुंडे म्हणाले, बहीण भावाचं नातं संपलं; पंकजा म्हणाल्या, “रक्ताचे नाते…”

परळी : (Dhananjay Munde On Pankaja Munde) जनता जर माझ्या पाठिशी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाहीत, या पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, धनंजय मुंडे यांनी थेट नात्यावर विषय नेला. यावेळी ते म्हणाले, आमच्यात आता बहीण भावाचं नातं राहिलेलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. नातं अगोदर होतं. आता राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी आहोत, प्रतिस्पर्धी आहोत.
यावर माध्यमांनी पंकजा मुंडेंना विचारले असता त्या म्हणाल्या, “रक्ताचे नाते कधीच संपत नाही. आम्ही ज्या घरात जन्मलो त्या घराचे काही संस्कार आहेत. त्यांनी जरी वैरी म्हटले असले तरी मी कोणाशी वैर बाळगत नाही. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेचा वैरी आहे. तो माझा वैरी आहे”, असं उत्तर त्यांनी धनंजय मुंडे यांना दिलंय.
धनंजय मुंडे यांनी नात्यातल्या दुराव्याबद्दल भाष्य करुन बहीण भावाच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची कबुलीच दिली. पण धनंजय मुंडे यांनी जरी नातं संपलं म्हटलेलं असलं तरी पंकजा यांनी मात्र समजूतदारपणाची भूमिका घेत, ‘असं कुणी म्हटल्याने नातं संपत नसतं अन् राहिला वैर भावनेचा विषय तर माझा कुणीही वैरी नाही’, असं म्हटलं.