ताज्या बातम्यारणधुमाळीशेत -शिवार

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; धनंजय मुंडे म्हणाले, “कृषीमंत्री तर सोडा…”

मुंबई | Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Government – परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरताना दिसत नाहीत, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे. तसंच हे सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आलं असून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आज (20 ऑक्टोबर) ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरत आहेत, हे माहिती नाही. शेतकरी संकटात असताना राज्यात सरकारचे अस्तित्त्वच दिसत नाही. विरोधी पक्ष या समस्येवर आवाज उठवत आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही, तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आलं आहे. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थाशिवाय त्यांना काहीही दिसत नाही”, असा खोचक टोलाही धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, “या सरकारला शेतकऱ्यांचं नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा की न करावा, हे त्यांना माहिती नाही. विरोधी पक्ष जेव्हा एखादी मागणी करतो, त्याकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे, हे राज्याच्या संस्कृतीला परवडणारे नाही.”

“परतीच्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले, ते खराब झाले आहेत. एकतर या सरकारनं मंत्रीमंडळ विस्तार उशीरा केला, त्यात पालकमंत्र्यांची नावं उशीरा घोषित केली. याचा परिणाम असा झाला की, कोणतीही विमा कंपनी याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही. 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असताना, कुठेही पंचनामे झालेले नाहीत. याबाबत मी तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी केली” असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये