डिजिलॉकर

श्रुती कुलकर्णी, पुणे
डिजिलॉकर हे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेले पोर्टल आहे. जिथे तुम्ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे सेव्ह करू शकताे. अनेक महत्त्वाची कागदपत्रे यात सुरक्षित ठेवू शकतो.
राहुल आणि रोहित दोघे अगदी खास मित्र होते. ते नेहमी सोबतच शाळेत जात व येत असत. दोघेही अभ्यासात हुशार होते. त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. यंदाच्या दहावीच्या परीक्षेतही दोघांनी उत्तम गुण संपादन केले. त्यामुळे पालकांनी त्यांना शिक्षणासाठी शहरात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील महाविद्यालयात निघण्याची तयारी झाली. दोघांत मिळून एकच बॅग त्यांनी घेतली व प्रवेशाच्या दिवशी लवकरच पोहोचले.
महाविद्यालय पाहिल्यानंतर दोघांची स्वारी भारी खूश होती. प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आणि रांगा लागल्या. शिपाईकाकांनी सर्वांना सूचना दिल्या, की आपली कागदपत्रे जवळ ठेवा. दोघांनी बॅगेतील कागदपत्रांची पिशवी काढायला घेतली. पाहतात तर काय दोनपैकी एकच पिशवी सोबत आणलेली व एक ओरिजनल कागदपत्रांची पिशवी घरीच राहिली. आता दोघेही एकमेकांकडे केविलवाणे चेहरे करून पाहू लागले. राहुल म्हणाला, “अरे रोहित, मी आपल्या दोघांच्या ओरिजनल व झेरॉक्स कागदपत्रांच्या दोन पिशव्या केल्या होत्या. नेमकी ओरिजनल कागदपत्रांची पिशवी घरी राहिली.’’ “आता आपला प्रवेश रद्द होणार?” रोहित डोळ्यांत पाणी आणून विचारतो. तेव्हा त्यांच्या मागे उभा असलेला प्रणव त्यांना विचारतो, “काय झालं मित्रांनो? काही अडचण आहे का?” त्यावर राहुल सांगतो, “अरे मित्रा, आम्ही दोघं एका गावातून प्रवेशासाठी आलो आहोत. पण सकाळी गडबडीत आम्ही ओरिजनल कागदपत्रांची पिशवी घरी विसरलो.’’ “पण झेरॉक्स आहेत” रोहित मधेच बोलतो.
प्रणव म्हणतो, “करूया आपण काही तरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ.” राहुल काळजीने विचारतो, “पण ओरिजनल कागदपत्रे नसल्याने आमच्या प्रवेशप्रक्रियेत अडथळा येईल का?” प्रणव म्हणतो, “अडथळा येऊ शकतो. पण तो टाळण्यासाठी आपल्याकडे डिजिलॉकरचा पर्याय आहे. “डिजिलॉकर?”, राहुल व रोहित दोघे विचारतात. प्रणव म्हणतो, “हो डिजिलॉकर. तुम्हाला नाही माहिती का?” दोघेही मान नकारात्मक डोलावतात. प्रणव सांगू लागतो, “डिजिलॉकर हे एक भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त असलेले पोर्टल आहे. जिथं तुम्ही सर्व महत्त्वाची कागदपत्रं सेव्ह करू शकता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, गुणपत्रिका व विमा यांसारखे आपल्याला गरजेची सरकारी, तसेच इतरही महत्त्वाची कागदपत्रे आपण यामध्ये सुरक्षित ठेवू शकतो. हे पोर्टल सरकारमान्य असल्यामुळे आपण सर्व कागदपत्रांची डिजिटल फाईल दाखवली, तरी चालते. कागदपत्रांचा दस्तऐवज क्रमांक यासाठी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. जसे की, जर तुला पॅनकार्ड या ॲपमध्ये जोडायचे असेल, तर पॅन कार्ड क्रमांक व पॅन कार्डवरील नाव किंवा गुणपत्रिका जोडायची असेल, तर परीक्षा क्रमांक, वर्ष, परीक्षेचे स्वरूप व एकूण गुण माहिती असणे आवश्यक आहे.’’ राहुल आणि रोहित दोघेही प्रणवला म्हणाले, “मित्रा, या पोर्टलची माहिती दिल्याबद्दल तुझे खूप आभारी आहोत!’’



