मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप न मानणाऱ्या 39 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. हा प्रकार घटनेचं उल्लंघन असल्याचा दावा शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी अरविंद सावंत म्हणाले, “सुरुवातीला आम्ही 16 लोकांचं सदस्यत्व रद्द करावं यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं यावर सुनावणीसाठी 11 जुलैची तारीख दिली. तरीही ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मग हे संविधानिक कसं? हेच आम्हाला कळत नाहीए. त्यातच आता आज अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या प्रतोदांनी सर्व आमदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला. त्यानंतर मतदान झालं, मतमोजणी झाली. यामध्ये शिवसेनेच्या 39 सदस्यांनी व्हीप पाळला नाही. त्यानंतर आमच्या प्रतोदांनी पीठासीन अधिकाऱ्यांना भेटून याबाबतच पत्र दिलं. यामध्ये 39 सदस्यांवर कारवाईची मागणी केली. यानंतर संध्याकाळी या ३९ जणांविरोधात आम्ही नव्या विधानसभा अध्यक्षांकडे घटनेतील परिशिष्ठ 10 मधील कलम 2 अ नुसार उल्लंघनासाठी त्यांना अपात्र केलं पाहिजे अशी नोटीस आम्ही अध्यक्षांना दिली आहे.”
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला बोलवायला पाहिजे. पण त्यांनी तसं केलं नाही. तसंच सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं असा ठराव केला नाही की, पक्षा बाहेरील व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्रीपदी नेमतो आहोत. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही कोणत्या अधिकाराखाली शपथ घ्यायला लावली. याबाबतही आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत, असं देखील अरविंद सावंत यांनी सांगितलं.