
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पुर्वसंध्येला भाजपच्या नेत्यांकडून पैसे वाटपाचा प्रयत्न झाला. याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर शनिवार दि. 25 रोजी दिवसभर दगडूशेट हलवाई गणेश मंदिरासमोर सहपत्नीक उपोषणाला बसले होते. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, त्याचा भाजप नेत्यांवर काही फरक पडला नसल्याचं दिसून आलंं.
कसब्याची लढत भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी प्रचाराला भाजपने केंद्रीय गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. त्यामुळे आज कसबा आणि पुण्यातील मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. राजकीय पक्षांकडून कधी नव्हे इतका जोरदार प्रचार झाल्याने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाचा टक्का किती असणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.
मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पैशांचा वारेमाप वापर केला जात असल्याचे समोर आलं. पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेता असलेले गणेश बीडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी विचारणा केली असता बीडकर यांनी त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कसबा मतदारसंघातील मालधक्का चौकातील अशोक कॅाम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. गणेश बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह याठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा काँग्रेसचा आरोप. मारहाणीनंतर काँग्रेस कार्यकर्ते समर्थ पोलीस स्टेशनला जमा. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे देखील समर्थ पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.