नाशिक जिल्ह्यात एकाही घरात दिवाळी सण साजरा होणार नाही, मराठा समाजाचा मोठा निर्णय
नाशिक | Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. तर जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, असा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) घेतला आहे. तसंच आता नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी दिवाळी (Diwali) सण साजरा न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवाळी साजरा न करण्याचा निर्णय मराठा समाजानं घेतला आहे. नाशिकमधील शिवतीर्थावर मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगेंची प्रकृती बघता आणि मराठा समाज आरक्षणासाठी झगडत असताना नाशिक शहरासह जिल्ह्यात एकाही घरात दिवाळी साजरी होणार नाही, असा निर्णय सकल मराठा बांधवांनी घेतला आहे.
नाशिकच्या शिवतीर्थावर मागील 50 दिवसांपासून सकल मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये नाना बच्छाव हे गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. तर या ठिकाणी आज मराठा समाजाची बैठक घेण्यात आली होती.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलनं केली जात आहेत. यामध्ये पुणे, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.