राजश्री क्षीरसागर – सुपेकर
Diwali 2023 : चाळ संस्कृती आजही लक्षवेधी ठरते.. खासकरून दिवाळीच्या सणाला फ्लॅट संस्कृती वाढत असताना ही चाळीतली दिवाळी सर्वांना हवीहवीशी वाटते. उंच उंच मजल्यावर राहणे याची संस्कृती वाढतेय, अश्या संस्कृतीत माणुसकीचा, मैत्रीचा आणि नात्याचा आपलेपणा, गोडवा दुरावला जात आहे, असं प्रकर्षाने जाणवत.. पण आज ज्या चाळी आहेत त्यात दिवाळीचा गोडवा काही वेगळाच असतो. अगदी दिवाळीचा फराळ बनवण्यापासून हा गोडवा सुरू होतो. वडील बँकेत होते. ते सुरवातीला शनिवार पेठेत राहत पण 1969 च्या पुरामध्ये घर वाहून गेलें त्यावेळेस त्यांना चाळी allot केल्या. मग पूर्ण वास्तव्य तिथंच माझा जन्म हा चाळीतलाच.मे महिन्याच्या सुट्टीपासून ते सगळे सण एवढे उत्साहात पार पडायचे आजही तो एक एक क्षण आनंदाच्या आठवणींना पुरेसा होतो.. खरी माणुसकीची श्रीमंती आम्ही अनुभवली असं म्हणेन आता आम्ही फ्लॅटमध्ये कोंडलेल्या अवस्थेत राहतो. कोणताही सण असू दे, सर्वांचे दरवाजे बंद म्हणजे बंद. एकाच्या घरात काय चाललंय ते बाजूच्या फ्लॅटवाल्यांंनाही समजत नाही, इतकी प्रायव्हसी जपली जाते. असो.
तर चाळीतले बऱ्यापैकी मुलं हीं एकाच शाळेत होती. त्यामुळे मित्र मैत्रिणी परिवार हा मोठा नसला तरी जिवाभावाचा होऊन गेला. अगदी काका मावशी आत्या यांच्या मुलांबरोबर जसं नातं असतं अगदी त्याप्रमाणे शाळेत तर आम्ही भाऊ बहिणी वाटायचो. एकाच घरातले जणू काही फुलं धम्माल यायची घरा शेजारील सुट्टीत कदम आत्याकडे त्यांची नातवंड यायची मुंबई हुन आवर्जून आम्ही त्यांची खेळण्यासाठी वाट पाहायचो. ती मैत्री एक वेगळीच होतं गेली.एका चाळीत आठ खोल्या आणि सगळ्यांच्या घरापुढे अंगण होते. त्यामुळे आम्हाला खेळायला भरपूर जागा असायची लपाछपी, शिरापुरी, टपरीपाणी हे तर आमचे आवडते खेळ आठही खोल्यांचे दरवाजे एकाच दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला उघडायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच सगळ्यांचे दरवाजे उघडायचे, ते रात्री दहा वाजताच बंद व्हायचे. एका शेजारच्या घरातील वस्तू, पदार्थ, जिन्नस या घरातून त्या घरात बिनदिक्कत फिरायचे. कसलाही औपचारिकपणा नव्हता. बर्यापैकी एकोपा जपून होती सर्व कुटुंबं. म्हणजे कोणाची भांडणं व्हायची नाहीत अशातला प्रकार नव्हता, परंतु अशी भांडणं फार दिवस टिकायची नाहीत. आमच्या चाळीत सर्व सण भोंडला, दांडिया, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे सगळेच पारंपरिक खेळ सण अगदी धूमधडाक्यात साजरे व्हायचे. आणि दिवाळी म्हणजे तर आठ दिवस अक्षरशः आनंदाचा हास्याची खेळाची मैफिल असायची.
माझ्या आईला मोठे अॅल्युमिनियमचे डबे भरून भरून दिवाळीचे सर्व पदार्थ करायची भारी हौस होती. दिवाळीच्या आठ-दहा दिवस आधीपासूनच माझ्या आईची वेगवेगळी भाजणी, फराळच्या पदार्थाची तयारी ड्रायफ्रूट्स, रवा, मैदा, तेल, तूप, इत्यादी पदार्थांबरोबर घनघोर लढाई सुरू असायची. बेसन, रवा, मैदा, पोहा शेंगदाणे निवडणे चाळणे, अशी काम सुरू व्हायची.अंगाणच्या भिंतीना कलर, झाडाच्या कुंड्याना काव लावणे, अंगण स्वच्छ घासून धुवून घेणं, वगैरे सर्व प्रकार दुपारच्या जेवणानंतर चालू व्हायचे ते अगदी अंधार पडेपर्यंत चालू असायचे. अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या घरात आलटून-पालटून हाच कार्यक्रम असायचा. सर्वांच्या घरात दणकावून दिवाळीचे पदार्थ बनवले जायचे. या सर्व पदार्थांना मुंबई, पुणे, नगर, नाशिक, कोकण अशा वेगवेगळ्या चवी असायच्या. प्रत्येक घरातले पदार्थ चवीला वेगवेगळे लागायचे. मग उत्सुकता असायची दिवाळीच्या पहिल्या अभ्यंग स्नानाची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी सर्वात आधी उठून घराच्या समोरच्या ग्राउंड वर येऊन कोण फटाके लावतो ह्याची स्पर्धा असायची. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी पहाटे तीन-चार वाजताच कोणीतरी सुतळी बॉम्ब पेटवायचं.धड्डड्डम्म्म्म् करून मोठा आवाज व्हायचा. आई सुवासिक उटणे, तेल तयार करून द्यायची. पटापट दात घासायचे आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायची यासाठी घाई गडबड व्हायची. चंदन मोती साबण लावायचा,एवढ्या छान थंडीत अंगावर गरम गरम पाणी ओतून घ्यायचं की झाली आमची पहिली आंघोळ.
संध्याकाळ झाली कीं अंगणात पुन्हा मुली आणि बायका नव्याने रांगोळी काढायला बसायच्या. विविधरंगी पणती आणि कंदिल लाईट च्या माळानी आमचं अंगण उजळून निघालेल असायच. प्रत्येकाच्या घरातून दिवाळीचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असायचा. दिवाळीचा हा आनंद आठ-दहा दिवस अखंड ज्योतीप्रमाणे प्रत्येकाच्या चेहर्यावर लखलखत असायचा. दिवाळी दिवाळी म्हणून जी म्हणतात ती या आमच्या चाळ संस्कृतीत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जायची. घरात वडील एकटे कमावणारे होते आणि त्या एकट्या माणसाच्या कमाईत आम्ही दणदणीत दिवाळी साजरी करायचो. त्या वेळी दिवाळीतल्या आनंदाला पारावार नसायचा.
आता मात्र दिवाळीमध्ये तो आनंद निरागसता, उत्सुकता, हे लुप्त होतांना दिसतं आहे. जाहिरातीच्या आणि प्रसिद्धीच्या जगात हा साधा संस्कारी आनंद सण हरवताना दिसतं आहे. फटाक्यांच्या मोठाल्या आवाजामुळे आता कानाला त्रास होतो. दिवाळीचे पदार्थ बनविण्यासाठी आता वेळही नाही आणि खाण्याची फारशी इच्छा नाही वजन आणि शुगर वाढी च्या भीतीने रांगोळीची जागा रांगोळी छापने आणि मातीच्या किल्याची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली.. नवीन कपड्यांचे अप्रूप राहिले नाही. शॉपिंग विंडोच्या जमान्यात आता फक्त मला दिवाळीतील दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट आवडतो. चारही बाजूने बंदिस्त असलेल्या फ्लॅट संस्कृती मध्येस्टॅंडर्ड ऑफ लिविंग च्या नावाखाली शांतपणे बसून राहणं याशिवाय दिवाळीत काहीच वेगळी धम्माल राहिली नाही. मग हमखास आठवते ती आणि आम्ही लहानपणी साजरी केलेली चाळीतली दिवाळी.