दिवाळीच्या सुट्टीत मुलांकडून करून घ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज
Diwali 2023 : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या आनंदापेक्षा मुलांच्या सुट्ट्यांचे टेन्शन पालकांना अधिक असते आणि सहामाही परीक्षा संपल्या की मुलांना दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे याचे वेध लागतात. दिवाळी चार दिवसांची असली तरी सुट्टी मात्र चांगली 15 ते 20 दिवसांची असते. मग या दिवसांत मुले घरात असली की दंगा करणार आणि घरभर पसारा घालणार. मग अशावेळी मुले शांत बसावी म्हणून टीव्ही लावून दिला जातो किंवा मोबाईल हातात सोपवला जातो. पण मुलांना शांत बसवण्याचा हा एकच मार्ग आहे का? तर नाही. 15-20 दिवसांच्या कालावधीत मुलांकडून काही अॅक्टिव्हिटी करून घेऊ शकता ज्यातून ते काहीतरी नवी शिकू शकतील आणि आपल्या सुट्ट्या देखील एन्जॉय करु शकतील.
दिवाळी कॅम्प्स
दिवाळी कॅम्प्सला गेल्याने हाती असलेला मोकळा वेळ सत्कारणी लागेल. त्याचबरोबर मुलांना नवनव्या गोष्टी शिकायला मिळतील. त्याठिकाणी मुलांच्या नवीन ओळखी होतील आणि वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतील. कॅम्प्समधील विविध उपक्रमांमुळे मुलांचे मन त्यांच्या आवडीच्या गोष्टीत रमेल. त्यांना स्वतःची जबाबदारी स्वतः घेण्याची सवय लागेल. त्यांच्यात सकारत्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.
हॉबी क्लासेस
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना व्यस्त ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे त्यांना हॉबी क्लासमध्ये घालणे. प्रत्येक मुलाला एका विशिष्ट गोष्टीत अधिक रस असतो. उदा. नाचणे, गाणे, चित्र काढणे, इत्यादी. मुलांमध्ये असलेल्या कलेची त्यांना स्वतःला जाणीव होण्याची ही योग्य वेळ आहे. हॉबी क्लासेसमध्ये गेल्याने त्यांना त्यांच्यातील छुप्या कलेची जाणीव होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर त्यांना नव्या गोष्टी शिकता येतील.
रांगोळी काढणे
बहुतेक घरात रोज सकाळी आणि दिवाळीत संध्याकाळी रांगोळी काढली जाते. पण रांगोळी हा प्रकार मुलांना खेळायला देण्यासाठी सहसा लक्षात येत नाही. जरा मोठी मुले असतील तर त्यांना रोज मोठी रांगोळी काढायला सांगा. आणि जरा लहान मुले असतील तर पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी चक्क खेळायला द्या. या अॅक्टिव्हिटीमुळे मुलांना किमान तासभर गुंतवून ठेवायची ताकद असते. यामुळे त्यांना रंगांचे देखील ज्ञान मिळेल.
किल्ला बनवणे
किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास कळतो. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मुलांना भौगोलिक आणि बांधकामशास्रांची ओळख होते. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मुलांच्या मनामध्ये रुजवण्याच काम होत. शिवाय किल्ल्यांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा विचार बालमनावर रुजवला जातो. दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे.
फॅमिली ट्रिप
पालकांनी आपल्या मुलांसोबत चांगला मजेशीर वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. वर्षभर कामाच्या गडबडीत अनेकदा मुलांसोबत वेळ घालवायला सवड मिळत नाही. मग दिवाळीची सुट्टी ही एक उत्तम संधी आहे. एखादी जागा पुस्तकात, टी.व्हीवर पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवणे फार शिकवणारे असते. म्हणूनच मुलांसोबत नवनव्या ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला मुलांसोबत वेळही घालवता येईल आणि छान आठवणी तयार होतील.
पुस्तक वाचन
मुलांना आत्तापासूनच वाचनाची सवय लागली पाहिजे. मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी हा सुट्ट्यांच्या काळ योग्य आहे. सुरुवातीला तुम्हालाही पालकांनाही मुलांसोबत बसून वाचावे लागेल, नंतर हळूहळू तेही शिकतील. रंगबिरंगी चित्रांनी सजलेले स्टोरी बुक हे स्टार्टर्ससाठी योग्य आहे, यामुळे त्यांच्यामध्ये चित्रे पाहण्याची उत्सुकता निर्माण होईल. मुलांसाठी वेळ घालवण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि यातून त्यांना हसतखेळत अनेक गोष्टी शिकवताही येतील.
गार्डनिंग
झाडे आणि वनस्पतींच्या जवळ राहून मुले काळजी घ्यायला शिकतात. ते शिकण्याची हीच योग्य वेळ आहे कारण त्यांच्याकडेही भरपूर वेळ आहे. जे मुले शहरात रहात असल्यास त्यांना जवळच्या रोपवाटिकेत घेऊन जा आणि त्यांच्या आवडीची रोपे आणायला सांगा. रोपांची काळजी घेण्यासाठी त्यांना रोपवाटिका करणाऱ्या टिप्स विचारण्यास सांगा. अशा प्रकारे ते स्वतःला वनस्पतींच्या जवळ जातील आणि त्यांची काळजी घेतील.
कुकिंग
मुलांसोबत स्वयंपाक करणे ही एक मजेदार अॅक्टिव्हिटी असू शकते. काही मुले तर स्वयंपाकाचा आनंद घेतात. ज्या मुलांना स्वयंपाक करायला आवडत नसले तरी, त्यांना स्वयंपाकाची प्राथमिक कौशल्ये शिकवली पाहिजेत. सर्व मुलांना चॉकलेट केक बनवण्यात नक्कीच मजा येईल. किंवा त्यांच्या आवडीची रेसिपी बनवून त्यांना मदत करा आणि ते बनवताना त्यांना मदत करा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आरोग्यदायी आहाराची सवय देखील होईल.