एजंटांवर कारवाईचे ढोंग नको , स्वार्थाला लगाम घाला
श्री विठ्ठलाच्या विकत दर्शनाचे एक मोठे रॅकेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात अनेक विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत असलेल्या सदस्य , अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत आहे , हे आता गुपित राहिलेले नाही.
आश्चर्य म्हणजे इतकी मोठी बदनामी होऊन देखील समिती चे सदस्य आणि अधिकाऱ्यांना स्वतःच्या कपाळावर लागत असलेला कलंकाची अजिबात फिकीर नाही. इतके दोषारोप , बदनामी , कूचेष्टा होऊन देखील विकत दर्शनाचे आणि आप्त सगग्या – सोयऱ्यांना वशिल्याचे दर्शन घडविण्याचे प्रकार सर्रास दररोज सुरू आहेत.
काल चार हजार रुपये देऊन विकत दर्शन देणाऱ्या एका फुल विक्रेत्यावर कारवाई झाली परंतु मंदिराच्या बाहेर व्यवसाय करत असलेला हा व्यक्ती पैसे घेऊन दर्शन देऊ शकतो याचा अर्थ मंदिर समितीमधील कच्चे दुवे देखील यामध्ये सहभागी आहेत. सुमारे सहा महिन्यापूर्वी देखील असाच विकत दर्शनाचा प्रसंग घडला त्यावेळी देखील काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी देखील असाच एक प्रकार घडला त्यावेळी तर बोगस देणगी पावत्या तयार करून परस्पर देणगी लाटल्याचे देखील प्रकार घडले. विशेष म्हणजे आज त्या सर्व घटनांमध्ये सहभागी असलेले आणि संशयित असलेले अनेक घटक आजही मंदिर समितीमध्ये कार्यरत आहेत.
मंदिर समितीचे सदस्यच प्रचंड माणसे सोडतात , वशिल्याचे दर्शन घडवितात हे चित्र मंदिर परिसरात नित्याचे झाले आहे .
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनीच हा ताल सोडल्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे कर्मचारी आणि बाहेरचे व्यावसायिक दलाल यांनीही लाज सोडली आहे. आज संबंधित फुल विक्रेता आणि सिक्युरिटी सर्विसेसच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील परंतु या बस बस पोरीचे मूळ हे सदस्यांच्या दुर्लक्ष मध्ये , त्यांच्या साधत चाललेल्या स्वार्थापोटी त्यांच्यात आलेल्या लाचारीमध्ये आहे .
दर्शनाप्रमाणे श्री विठ्ठलाच्या पूजा नोंदणी बाबत देखील सदस्यांनी चक्क एखाद्या भागीदारी सारखी वाटणा वाटणी केली आहे . प्रत्येक सदस्याने तीन तुळशी पूजा सुचवाव्यात अशी अंतर्गत व्यवस्था झाली असल्याची चर्चा आहे. सुमारे दोन हजार रुपयाची ही पूजा अनेकदा पंचवीस हजारात देखील विकली जात असल्याची चर्चा आहे.
तथाकथित समाजसेवक , नगरसेवक हे पै पाहुण्यांना दर्शन मिळतात म्हणून आवाज उठवत नाहीत. मंदिराच्या आणि पर्यायाने पंढरपूरची बदनामी नको म्हणून पत्रकार आक्रमक भूमिका घेत नाहीत , काही टुकार पत्रकार अशा वाम मार्गाने चालणाऱ्या दर्शन व्यवस्थेचे लाभार्थी असल्यामुळे देखील आवाज करत नाहीत. वरिष्ठ मंत्री प्रशासकीय अधिकारी यांनाही कधीतरी व्हीआयपी दर्शनाकरिता फोन करावा लागतो म्हणून ते देखील अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. काही सदस्यांना पैसे मिळत असल्यामुळे तर काही सदस्यांचे प्रतिष्ठा अबाधित राहत असल्यामुळे ते देखील या संपूर्ण व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत नाहीत…. एकूणच यावर कोणीही यावर बोलायला तयार नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य भक्तांवर आणि रांगेमध्ये तासून तास उभा राहणाऱ्या भाविकांवर घोर अन्याय होत आहे.
यातून काही जणांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्याची जात , धार्मिक मत मतांतरे, मंदिर सरकारीकरण – गैरसरकारी करण असे मुद्दे पुढे आणायचे आणि सर्व आवाज दाबून टाकायचे ही एक नवी दादागिरी गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीमध्ये बोकाळली आहे.
समितीचे सहाअध्यक्ष असलेले ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांची जबाबदारी मोठी आहे. समितीच्या हा कारभार शिस्तप्रिय व्हावा , पारदर्शक व्हावा यापेक्षा आपल्या पदाला पुन्हा मुदतवाढ कशी मिळेल हे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. परंतु पुण्यातील अनेक आमदारांनी आणि डझनभर महाराजांनी सहअध्यक्ष आणि काही समिती सदस्यांच्या पुनर्नियुक्ती करता पत्रे दिली असली तरी देखील मंदिरातील या बजबज पुरीमुळे आपलीच कारकीर्द कलंकित होत आहे आणि त्यामुळे आपली पुनर्नियुक्ती होणार नाही याचे भान दुर्दैवाने या पदाधिकाऱ्यांना येत नाही .
वरिष्ठ मंत्री आणि सरकारला त्यांच्या प्रतिमेचे पडले आहे अशा मध्ये त्यांची प्रतिमा उज्वल करणारे पदाधिकारी असणे हे खूप गरजेचे आहे . पण केवळ मिरवणे , समितीच्या गाड्या घोडे राबविणे , मर्जितील लोकांना भक्तनिवासच्या कॅन्टीन पासून ते इंटरनल डिजिटलयझेशन पर्यंतच्या सर्व कंत्राट्याची वाटप करत बसणे आणि उठलं की व्हीआयपी सावज शोधत नित्यक्रम चालू ठेवणे याच्या पलीकडे जाऊन सामान्य वारकऱ्यांकरीता त्याच्या हिताचे काहीतरी करण्याची गरज आहे..
तळटीप :
आषाढी एकादशीच्या पहाटे , सत्ता परिवर्तनाच्या पूर्वीचीच मंदिर समिती कार्यरत आहे ही वस्तुस्थिती एका पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिर समिती बदलण्याच्या हालचाली तीव्र केल्या. एक ऑगस्ट रोजी विधी व न्याय खात्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपला अहवाल पाठवला. अजित पवार ने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या समिती सदस्यांकरिता नावे मागविण्यात आली. समिती पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू आहे. आजच्या प्रकारामुळे , ‘ विद्यमान मंदिर समितीमधील एकालाही पुन्हा संधी देऊ नये ‘ , असे पत्र मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या आमदाराने मुख्यमंत्री महोदयांना लिहिले आहे . ( त्याची प्रत राष्ट्र संचार कडे उपलब्ध आहे )