ताज्या बातम्या

ऑनलाईन खरेदीचे फायदे

Diwali 2023 : सण, समारंभ जवळ आले की, बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच झुंबड उडते, कुठल्याही शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेलेल्या दिसून येतात. त्यातल्या त्यात दिवाळी सण म्हटला की मग विचारुच नका. विविध प्रकारच्या वस्तू, खाद्य पदार्थ, कपडे, दागिने, भेटवस्तू अशा एक ना दोन अनेक प्रकारच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल या दिवसात वाढलेला दिसतो. प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी अलिकडच्या काही वर्षांत घरबसल्या ऑनलाईन खरेदीचा पर्याय ग्राहकांच्या चांगलाच अंगवळणी पडत चालला आहे. बाजारात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा घरबसल्या आपल्याला पाहिजे ती वस्तू ऑनलाईन पध्दतीने खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. काहिशा सोप्या आणि सुटसुटीत अशा या ऑनलाईन खरेदीबाबत आज जाणून घेऊ यात.

कोरोनाचा फायदा

दोन वर्षांपूर्वी अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकट काळात खऱ्याअर्थाने ऑनलाईन खरेदीचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. कोरोनाचा अनेकांना तोटा झाला मात्र ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या उत्पादक कंपन्यांना कोरोनालाटेचा चांगलाच फायदा झाला. संपर्क टाळण्याकरिता आणि वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने या काळात ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला. अशा प्रकारच्या खरेदीचे फायदे लक्षात आल्याने पुढेही ऑनलाईन खरेदीचा सिलसिला कायम असल्याचे दिसते.

शॉपिंग ॲप्स

आजच्या घडीला ऑनलाईन खरेदीसाठी फ्लिपकार्ट, मित्रा, अमेझॉन, बीबीडेली हे काही शॉपिंग ॲप्स सर्व सामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यापैकी संपूर्ण भारतात सर्वात जास्त पसंती अमेझॉनला दिली जात असल्याचे निदर्शनास येते. या ॲपवर विविध कंपन्यांच्या भरपूर प्रमाणात वस्तू उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या प्रथम पसंतीचा मान अमेझॉनलाच दिला जातो. त्याखालोखाल फ्लिपकार्ट या ॲपला ग्राहकांनी चांगले रेटिंग दिलेले आहे. या ॲपवरही मोठ्या प्रमाणावर उत्तम दर्जाची उत्पादने उपलब्ध आहेत. मित्रा या ॲपने फॅशनेबल कपडे आणि पादत्राणे यामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. घरगुती वापरातील नित्याच्या ग्रोसरीसाठी बीबीडेली हे ॲपही ऑनलाईन खरेदीसाठी उपयोगाचे आहे.

आकर्षक ऑफर

सणासुदीच्या काळात त्यातल्या त्यात दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक कंपन्या ऑनलाईनच्या खरेदीवर विविध ऑफरचा भडीमार करतात. तेंव्हा कोणती ऑफर अधिक फायदेशीर आणि त्यासोबतच उत्कृष्ट उत्पादनाचा दर्जा याबाबी लक्षात घेऊन खरेदी करणे निश्चितच फायदेशीर ठरते.

पैशांची बचत

ऑनलाईन खरेदी करताना काही शॉपिंग ॲप्स क्रेडीटची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे वस्तू खरेदी करताना तात्काळ पैसे देण्याची गरज पडत नाही. खरेदी नंतर महिनाभराने पैसे द्यावे लागतात. शिवाय त्यावर व्याजही भरावे लागत नाही. त्यामुळे हाती असलेल्या पैशांची बचत होऊ शकते अथवा त्यापैशांचा इतर ठिकाणी विनियोग होऊ शकतो. एकंदरीत ऑनलाईन खरेदी ही नेहमीच फायदेशीर आहे. फक्त ती करताना आपली कुठे फसगत होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.


                       

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये